कोरोनाच्या संक्रमणात शाळा-महाविद्यालय सुरू करता येणार नाहीत-मंत्री सामंत
केंद्र सरकारने कोरोनाच्या संक्रमणात देशातील शाळा सुरू करण्यासाठी काही अटी आणि शर्ती लागू केल्या असल्या तरी महाराष्ट्रातील संक्रमणाची स्थिती आजही अपेक्षित इतकी कमी झालेेली नाही. ती कमी होईस्तोवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरू करणे शक्य नाही, असे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, महाराष्ट्रात तशी परिस्थिती नसल्याने राज्य सरकारने कोरोनाच्या संक्रमणात शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेत यातील संभ्रम दूर केला आहे.
राज्यातील कोरोना संक्रमणाची स्थिती आजही गंभीर आहे.
राज्यातील कोरोना मृत्यूदर कमी असला तरी यासाठी कोणताही धोका राज्य सरकार घेण्याच्या मनस्थितीत नाही. कोणत्याही शहरात शाळा वा महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय तिथल्या परिस्थितीवर अवलंबून आहे. ही परिस्थिती शहरात महानगरपालिकांकरवी हाताळली जात असल्याने जोवर कोरोनाचा अटकाव होत नाही, तोवर शाळा महाविद्यालये सुरू करण्यात येऊ शकत नाही, असे उदय सामंत यांनी नमूद केले.
कोरोनाचा प्रसार कमी होऊ लागल्यावर शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, त्यासाठी खात्रीशीर परिस्थिती निर्माण होणे गरजेचे असल्याचे सामंत म्हणाले. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील शाळा उघडण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार येत्या 15 ऑक्टोबरपासून देशातील शाळा उघडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉकअंतर्गत हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे, आणि ती जबाबदारी सर्वस्वी राज्य सरकारची असल्याने सरकार याबाबत खबरदारी घेत आहे, असे ते म्हणाले.
ग्रंथालये सुरू करण्याचा विचार
दरम्यान, राज्यातील बंद असलेली ग्रंथालये सुरू करण्याच्या मानसिकतेत राज्य सरकार आहे, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. येत्या काही दिवसात ग्रंथालयही सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. यासंदर्भात एक बैठकही पार पडली, यासाठी आवश्यक असलेल्या अटी आणि शर्ती पाळण्याची जबाबदारी ग्रंथालय चालकांवर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.