बीड

विवेक राहाडे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण:सुसाइड नोट निघाली बनावट

बीड, 03 ऑक्टोबर : मराठा आरक्षणाचा वाद पेटलेला असताना बीडमध्ये विवेक राहाडे नावाच्या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. विवेकची सुसाइड नोट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. पण, ती सुसाइड नोट विवेकने लिहिलीच नसल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

बीड तालुक्यातील केतूरा गावात राहणाऱ्या विवेक राहाडे या 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

यावेळी एक सुसाइड नोट आढळून समोर आली होती. यामध्ये ‘मी विवेक कल्याण राहाडे एक कष्टकरी आणि गरिब शेतकऱ्याचा मुलगा आहे.
मला जिवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मी आताच नीट मेडिकलची परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्यामुळे नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्राव्हेटमध्ये शिकवण्याची ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलाची किंव येईल आणि माझे मरण सार्थक होईल’ असा मजकूर लिहिला होता. ही सुसाइड नोट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती.

पण पोलिसांनी या सुसाइड नोटचा नीट तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. ही सुसाइड विवेकने लिहिलीच नव्हती. विवेकच्या मृत्यूचा फायदा घेत त्याच्या नावे बनावट सुसाईड नोट तयार करून ती सोशल मीडियाद्वारे व्हायरल करण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ते’ हस्ताक्षर विवेकचे नाही-तज्ञांचा निर्वाळा

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे नीट परीक्षेत माझा नंबर लागत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे विवेक राहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र, त्या मजकुरातील अक्षर विवेकचे नसल्याचा अहवाल औरंगाबाद येथील हस्ताक्षर तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे ही चिठ्ठी बनावट असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सामाजिक शांतता भंग करणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळं विवेक आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे.