देशनवी दिल्ली

खाजगी कर्मचाऱ्यांना खुशखबर: निवृत्तीच्या दिवसापासूनच पेन्शन लागू

नवी दिल्ली – भविष्य निर्वाह निधीचा सदस्य असलेला कर्मचारी ज्या दिवशी निवृत्त होईल त्याला त्या दिवसापासूनच पेन्शन लागू केली जाणार आहे. ईपीएफओने ही कामगारांच्या सोयीची सुधारणा केली असून ती 30 सप्टेंबर पासून अंमलात आली आहे.

सध्याच्या पद्धतीनुसार एखादा कर्मचारी निवृत्त झाला तर त्याची पेन्शन मंजुर होण्यास बराच कालावधी लागत असे, तसेच त्याला अनेक कागदपत्रांची पुर्तता करावी लागत असे. पण आता ज्या दिवशी हा कर्मचारी निवृत्त होईल त्या दिवसापासूनच त्याला निवृत्तीवेतन सुरू केले जाणार आहे.

कर्मचारी ज्या महिन्यात निवृत्त होणार आहे त्या महिन्यात त्यांनी कागदपत्राची पुर्तता करायची आहे, ती झाल्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या दिवसापासूनच त्याला पेन्शन लागू केली जाणार आहे.

त्यामुळे कामगारांचा मोठा मनस्ताप आणि हेलपाटे वाचणार आहेत. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही ही योजना लागू आहे.