सीरो सर्वेक्षणाचा दुसरा अहवाल:देशातील मोठी लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात सापडणार
नवी दिल्ली-ऑगस्ट 2020 पर्यंत देशातील दहा वर्षे वयावरील प्रत्येक पंधरावी व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह झाली, अशी माहिती नॅशनल सीरो सर्वेक्षणात उघड झाली आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी ही माहिती दिली आहे.
सीरो अहवालानुसार देशातील मोठी लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.
नॅशनल सीरो सर्वेक्षणाचा हा दुसरा अहवाल आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर आणि नीति आयोगाने एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. आगामी सणउत्सव आणि हिवाळ्याचा विचार करून राज्य सरकारांनी विशेष दक्षता घ्यावी असे आवाहन याप्रसंगी भार्गव यांनी केले. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषणही उपस्थित होते.
‘5 टी स्ट्रटेजी’चा अवलंब करा
कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘5 टी स्ट्रटेजी’चा अवलंब करावा असा सल्ला भार्गव यांनी यावेळी दिला. टेस्ट, ट्रॅक, ट्रेस, ट्रीट आणि टेक्नॉलॉजी अशी ही स्ट्रटेजी आहे. सीरोच्या दुसऱ्या अहवालानुसार देशाच्या ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा तितकासा परिणाम झालेला नाही पण शहरांमधील झोपडपट्ट्या व अन्य भागांमध्ये सर्वाधिक परिणाम जाणवत आहे, असे भार्गव यांनी सांगितले.