उस्मानाबाद

मराठवाड्यात पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १९४६ कोटीचा खरीप विमा मंजूर

लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २३ लाख ६ हजार शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. जवळपास निम्म्या शेतकऱ्यांनाच विमा परतावा मंजूर झाला आहे.

खरीप हंगाम २०१९-२० मध्ये या पाच जिल्ह्यातील ४६ लाख २ हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील १० लाख ८२ हजार, उस्मानाबाद ११ लाख ८६ हजार, नांदेड ११ लाख ९२ हजार, परभणी ८ लाख २१ हजार, तर हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख ४० हजार शेतकऱ्यांचा समावेश होता.
२३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते.

लातूर जिल्ह्यातील ६ लाख १८ हजार हेक्टर, उस्मानाबाद ५ लाख ७६ हजार हेक्टर, नांदेड ५ लाख ७८ हजार हेक्टर, परभणी ४ लाख ३० हजार हेक्टर, तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ५० हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश होता. जवळपास ८ हजार ५८१ कोटी रुपये विमा संरक्षित रकमेसाठी १८४ कोटी रुपये विमा हप्ता भरला गेला होता.

प्राप्त माहितीनुसार, पाच जिल्ह्यातील २३ लाख ६ हजार शेतकऱ्यांना १९४६ कोटी रुपये विमा परतावा मंजूर आहे. विमा परताव्याची ही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.