सेना-भाजप सध्या खूप दूर आहेत:फडणवीस उद्या पवारांचीही भेट घेऊ शकतात-सुधीर मुनगंटीवार
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या गुप्त भेटीच्या चर्चेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यानंतर भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे शिवसेना आणि भाजप सध्या खूप दूर आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत सध्या वातावरण नाही. संबंध तुटले नाहीत, पण संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस वेगळ्या काराणासाठी भेटले असू शकतात, असं मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. तसेच उद्या देवेंद्र फडणवीस अजित पवारांची आणि शरद पवारांची देखील भेट घेऊ शकतात, असंही त्यांनी नमूद केलं
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘केवळ एका बैठकीने शिवसेना-भाजपची युती होईल असं वाटत नाही. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एकत्र बैठक होण्याची गरज आहे. शिवसेना-भाजप आता एकमेकांपासून खूप दूर गेले असून एकत्र येण्यासाठी सध्याचं वातावरणही नाही आणि परिस्थितीही तशी नाही. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत एकत्र येत असतील तर त्यात राजकारण पाहू नका. ही बैठक माहित झाली याचा अर्थ ही बैठक गुप्त नाही हे उघड आहे. ज्या बैठकीत काही घडायचं असतं ती गुप्त राहते. ज्यात काहीच घडायचं नसतं त्या बैठकीचे व्हिडिओ, फोटो माध्यमांना मिळतात. बैठक झाली हे आम्हाला माहिती नाही.’
सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना-भाजप युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. ‘देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाली ही माहिती माध्यमांमधूनच कळते आहे. जर ही बैठक गुप्त असेल तर त्याची माहिती कुणालाही होण्याचं काही कारण नाही. ते दोघे एखाद्या कारणाने एखाद्या ठिकाणी एकत्र येत असतील तर प्रत्येक गोष्टीत राजकारणच असेल असं वाटणं योग्य नाही. दोन विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात. माध्यमांना ही माहिती मिळाली याचा अर्थ ही बैठक गुप्त नाही, या बैठकीत काहीही होत नाही. ज्या बैठकीत काही घडवायचं असतं ती बैठक कधीच गुप्त असू शकत नाही,’ असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
काही घडवायचं असतं ती बैठक गुप्त असते’
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘लपवाछपवी करण्याचं काही कारण नाही. ही बैठक झाल्याची माहिती आमच्यापैकी कुणालाच नाही. राजकारणात मी 40 वर्षांपासून काम करतो. या 40 वर्षात एका गोष्टीची माहिती निश्चित आहे ज्यात काही घडणार आहे ती बैठक गुप्त असते. ज्या बैठकीत काहीच होणार नाही त्या बैठकीचे फोटो व्हिडीओ तुम्हाला मिळतात.’