महाराष्ट्रमुंबई

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना लवकरच मोबदला-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि. २५: राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याने दिनांक २८ सप्टेंबर २०२० पासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे.

शासन निर्णय निर्गमित; लवकरच मोबदला मिळणार

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, आशा स्वयंसेविकांना आणि गट प्रवर्तकांना प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातील मंजुरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो. त्यासोबत आशा स्वयंसेविकांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने आशा स्वयंसेविकेस दरमहा २ हजार आणि गट प्रवर्तकांना दरमहा ३ हजार राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार लवकरच त्यांना सर्व मोबदला मिळणार आहे.

केंद्र शासनाकडे मागणी

याबरोबरच प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात गटप्रवर्तकांचा जो मोबदला कमी करण्यात आला आहे त्या मोबदल्याची मागणी नव्याने केंद्र शासनाकडे करण्यात येत आहे.

माझे कुटुंब- माझी जबाबदारी अभियानात काम करताना जोपर्यंत कोविड झालेल्या रुग्णांचे लवकर निदान होत नाही तोपर्यंत कोविड विरोधातील लढाई आपण पूर्णपणे जिंकणार नाही. आपल्या मदतीनेच राज्यात “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता आपणास केंद्र शासनाने दरमहा मंजूर केलेल्या १ हजार रुपयांव्यतिरिक्त दररोज १५० रुपये इतका मोबदला अदा करण्यात येणार आहे. तसेच याकामी सोबतीला मदतीसाठी एक स्वयंसेवकदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेताना आपणास सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज, सारखे संरक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मोहिमेतील माहिती संकलित करण्यासाठी व ती भरणे सोयीचे व्हावे यासाठी ॲप तयार करण्यात आले आहे. ॲपमध्ये माहिती भरताना काही अडचणी आल्यास उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रपत्रात लेखी स्वरूपात माहिती भरण्याची मुभा देखील आपणास दिली आहे असे ही मुख्यमंत्र्यांनी आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

कोरोना नियंत्रणात आशा स्वयंसेविकांचा अमूल्य वाटा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी सुरु असून राज्यात ग्रामीण आणि शहरी भागात मिळून ६६ हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका तर ४ हजार गटप्रवर्तक काम करत आहेत. आशा स्वयंसेविका योजनेमुळे राज्यातील नवजात बालकांचे मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्यात मोलाची मदत मिळाली आहे. कोविड १९ या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवतांना देखील त्यांची खुप मदत होत आहे. आशा स्वयंसेविकांनी कोविड प्रादुर्भावाच्या काळात प्रत्येक घराला भेट देऊन,कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून नियंत्रण मिळवण्यात अमूल्य वाटा उचलला आहे असेही मुख्यमंत्री या पत्रात आवर्जून म्हणतात.