देशनवी दिल्ली

कोरोनाचा संसर्ग चालूच: लॉकडाऊनला 6 महिने पूर्ण

अजूनही करोनाची साथ आटोक्‍यात येण्याची चिन्हे नाहीच

नवी दिल्ली – कोविड-19 ची साथ देशात पसरू लागल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला आज 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. ही साथ पसरायला लागली तेंव्हा देशात करोनाचे 500 रुग्ण होते. या रुग्णांची संख्या आता 57 लाखांपर्यंत पोहोचली आहे.

कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत. तसेच करोनाविरोधी लस विकसित करण्याचे कामही वेगाने सुरू अहे. मात्र अद्यापही लस उपलब्ध होण्याची कोणतीही निश्‍चित वेळ सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे करोनाचा आजार कधी आटोक्‍यात येईल, हे ठामपणे सांगता येऊ शकत नाही.

संसर्गाची साखळी तोडण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 मार्च रोजी संपूर्ण देशासाठी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यावेळी कोविड-19 ची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांची एकूण संख्या 500 इतकी होती, तर करोनाच्या संसर्गामुळे 12 जणांचा मृत्यू झाला होता.

सहा महिन्यांनंतर, अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची 57.32 लाख इतकी रुग्णसंख्या भारतामध्ये आहे. आज एका दिवसात एकूण 86,508 लोकांना करोनाची लागण झाल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे. तर देशभरात आतापर्यंत 91 हजार 149 मृत्यूमुखी पडले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी देशभरात 18,363 चाचण्या झाल्या होत्या. तर 22 सप्टेंबरपर्यंत या चचण्यांची संख्या 6 कोटी 62 लाख 79 हजाराहून अधिक झाली होती. या कालावधीत देशातील 46 लाख जण करोनामुक्‍त झाले अहेत. मात्र देशात अजूनही सामूहिक संसर्गाचा टप्पा असल्याचे इम्युन्युलॉजिस्ट सत्यजीत रथ यांनी सांगितले.

संसर्ग प्रामुख्याने शहरी आणि दाट लोकवस्तीत आढळत होता. मात्र आता संसर्गासाठी असे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. भारतात खऱ्या अर्थाने संसर्ग आटोक्‍यात आलाच नव्हता, असेही रथ यांनी सांगितले.