देशनवी दिल्ली

करोनावरील या लसीच्या वापराला देशात मिळू शकते परवानगी

नवी दिल्ली : देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे देशात कोरोनावरील लस विकसित करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. परंतु करोनावरील कोणत्या लसीला परवानगी देण्यात येईल याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) महत्त्वाची माहिती आता सर्वांसमोर सादर केली आहे.

आयसीएमआरकडून कोरोनाच्या लसीच्या वापराबाबत सांगताना म्हटले आहे, श्वसनाचा विकार असलेल्या व्यक्तींवर कोणतीही लस १०० टक्के प्रभावी ठरेल अशी विकसित झालेली नाही. ५० ते १०० टक्के प्रभावी ठरणाऱ्या करोनाच्या लसीच्या वापराला मंजुरी दिली जाऊ शकते, असे आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.
सेंट्रल ड्रग्‍स अँड स्‍टँडर्ड कंट्रोल ऑर्गनाइझेशनच्या (CDSCO) कोरोना लसीबाबत जारी करण्यात आलेल्या ड्राफ्ट गाईडलाईन्सच्या एका दिवसानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

‘श्वसनाच्या आजाराशी निगडीत कोणतीही लस १०० टक्के प्रभावी नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते कोणत्याही लसीमध्ये सुरक्षा, इम्युनोजेनिसिटी आणि कार्यक्षमता आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ५० टक्के कार्यक्षमता असलेल्या लसीलाही मंजुरी देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. आमचे लक्ष्य १०० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे आहे. परंतु त्याची कार्यक्रमता ५० ते १०० टक्क्यांच्या दरम्यान असेल,’ असे डॉ.भार्गव म्हणाले. ऑक्सफर्डच्या लसीच्या सुरूवातीच्या चाचण्यांमध्ये उत्तम निरिक्षणे नोंदवण्यात आली आहेत. लस इम्युन रिस्पॉन्स ट्रिगर करण्यात यशस्वी ठरली आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार भारतात तयार झालेली लस ही अधिक प्रभावी ठरणार आहे. त्याचे कम्पोझिशन सुलभ असून सुरक्षिततेकडेही लक्ष देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतात सध्या तीन लसींची मानवी चाचणी सुरू आहे. तसेच रशियामध्ये परवागी देण्यात आलेल्या स्पुटनिक-व्ही या लसीच्या मानवी चाचणीलाही भारतात परवानगी मिळण्याची शक्यता आहे. सध्या देशात सीरम इंन्स्टिट्यूटच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. तर आयसीएमआर आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि झायडस कँडिला या कंपनीच्या ZyCov-D या लसीचीही मानवी चाचणी सुरू आहे.