महाराष्ट्रवृत्तसेवा

मराठा आरक्षण आंदोलन पेटले:आंदोलनाची पहिली ठिणगी पडली माढ्यात

सोलापूर-मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय न आल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. आज सोलापुरात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची पहिली ठिणगी माढ्यात पडली आहे.

माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे.आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतरचा मराठा संघटनांनी पुकारलेला राज्यातील हा पहिलाच बंद असणार आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे.
दरम्यान,भल्या पहाटेच तरुणांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी माढा शहर दणाणून सोडलं आहे. त्यामुळे जिल्हाभरात आज दिवसभरात कशा पध्दतीने हे आंदोलन पार पडतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता राज्य सरकारचे प्रतिकात्मक श्राद्ध घातले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरक्षण स्थगितीला आज बारावा दिवस आहे. सकल मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांकडून आंदोलन न करण्याबाबत पोलीसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. पण तरीदेखील आंदोलन करण्यावर आंदोलक ठाम आहेत.त्या आंदोलनाची पहिली ठिणगी आज पडली आहे