महाराष्ट्रमुंबई

रस्ते अपघातातील जखमींसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा

मुंबई-रस्त्यांवरील अपघातग्रस्तांवर तत्काळ उपचार मिळणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन पैशांअभावी उपचार रखडू नयेत यासाठी महाविकास आघाडी सरकारने रस्ते अपघातातील जखमींसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा राबविण्यास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. जखमींना गोल्डन अवरमध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देतानाच सुमारे 74 उपचार पद्धतीतून 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजमितीस राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांवर अपघातात दरवर्षी सरासरी 40 हजार व्यक्ती जखमी तर 13 हजार व्यक्ती मरण पावतात त्यांना वेळीच उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकतात. या योजनेत अपघातानंतरच्या पहिल्या 72 तासासाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील. या उपचारांमध्ये अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णालयाच्या वास्तव्यातील भोजन याचा समावेश आहे. या योजनेसंदर्भात कोणतीही तक्रार नोंदविण्यासाठी टोलफ्री क्रमांक देखील असेल. राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी यांच्यामार्फत ही योजना कार्यान्वित होईल. योजनेसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीस आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल आणि विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

अपघातातील व्यक्ती कोणत्याही राज्यातील असली तरी विमा लागू

या योजनेत महाराष्ट्रातील रस्त्यावर झालेल्या अपघातामधील व्यक्तींना याचा लाभ मिळेल. ही व्यक्ती कोणत्याही राज्य, देशाची असली तरीदेखील त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात येतील. अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल.