देशनवी दिल्ली

सर्वात आधी करोनाची लस जेष्ठ नागरिकांनाच:सरकारचा विचार

नवी दिल्ली-सर्वाधिक धोका असलेल्या वयोगटाला लवकरात लवकर करोना व्हायरसवरील लस उपलब्ध करुन देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सरकार करोना लसीला इमर्जन्सी ऑथोरायझेशन म्हणजेच जलदगतीने मान्यता देण्याचा विचार करत आहे. हाय रिस्क ग्रुपमध्ये ज्येष्ठ नागरिक, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी ‘संडे संवाद’ या कार्यक्रमात रविवारी ही माहिती दिली.

‘एकमत झाल्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल’ असे हर्ष वर्धन यांनी सांगितले. लस चाचणीचा अंतिम टप्पा हा सहा ते नऊ महिन्यांचा असेल. एका ठराविक टप्प्यावर लशीच्या सुरक्षिततेची आणि ती प्रभावी असल्याची खात्री पटल्यानंतर आपातकालीन मान्यता म्हणजे इमर्जन्सी ऑथोरायझेशनचा विचार होऊ शकतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतात तीन लशी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. यात सिरम निर्मिती करत असलेली ऑक्सफर्डची लस, भारत बायोटेकची कोव्हॅक्सनी आणि झायडस कॅडिलाची लस आहे. “लशी बद्दल विश्वास वाटत नसेल, तर सर्वात आधी मी स्वत:ला ती लस टोचून घेईन” असे त्यांनी सांगितले. “ज्यांना सर्वाधिक गरज आहे, त्यांना ती लस सर्वात आधी उपलब्ध करुन दिली जाईल” असे हर्षवर्धन म्हणाले. करोना विषाणूवरील लस जानेवारी २०२१पर्यंत तयार होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.