मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 1 वाजता जनतेशी थेट साधणार संवाद
मुंबई, 13 सप्टेंबर : राज्यात सध्या कोरोनाचा धोका असताना अनेक राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. एकूण संपूर्ण परस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 1 वाजता समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे यावेळी ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
खरंतर, राज्यात रोज कोरोनाचे मोठ्या संख्येनं रुग्ण वाढत आहेत. अशात आरोग्य व्यवस्था डगमगली आहे. त्यामुळे कोरोनाला आवर कसा घालायचा असा महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. त्याहून पलीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक पेटून उठले आहेत. कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर भाजपकडून वारंवार ठाकरे सरकारला टार्गेट केलं जात आहे. त्यावर आज उद्धव ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
एकीकडे कोराना, मराठा आरक्षण आहेच तर दुसरीकडे कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. कंगनाने वारंवार ट्वीट करून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेमध्ये टीका केली. यावर शिवसेनेनंही सामनाच्या माध्यमातून टीका केली. पण कंगना प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा आदेश शिवसेना नेत्यांना देण्यात आला होता. त्यामुळे यावर आज खुद्द मुख्यमंत्री काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.