खुशखबर: ‘कोवॅक्सीन’ लशीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी;भारत बायोटेकची घोषणा
नवी दिल्ली : देशात करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालल्याचं दिसून येतंय. याच दरम्यान देशात विकसित होत असलेल्या भारत बायोटेकची करोना लस ‘कोवॅक्सीन’शी निगडीत एक खुशखबर समोर येतेय. ‘कोवॅक्सीन’ लशीचं प्राण्यांवर वापर यशस्वी ठरल्याचं ‘भारत बायोटेक’कडून जाहीर करण्यात आलंय. ‘कोवॅक्सीनची प्राण्यांवर झालेल्या चाचणीच्या परिणामांची घोषणा करताना भारत बायोटेकला अभिमान वाटतोय. हा परिणाम लाईव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये सुरक्षात्मक प्रभाव प्रदर्शित करतो’ असं ट्विट भारत बायोटेककडून करण्यात आलंय.
गैर-मानव सस्तन प्राण्यांवर (उदा. माकड, वटवाघूळ इत्यादी) करण्यात आलेल्या अभ्यासात कोवॅक्सीनच्या रोग प्रतिकारक क्षमतेचा परिणाम दिसून येतो. ‘कोवॅक्सीन’ माकडांमध्ये विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी अॅन्टीबॉडीज विकसित करण्यात यशस्वी ठरल्याचंही भारत बायोटेकनं स्पष्ट केलंय.
भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) मिळून करोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘कोवॅक्सीन’ ही लस तयार करत आहेत. स्वदेशी ‘कोवॅक्सीन’ला ‘ड्रग रेग्युलेटरी’कडून (DCGI) चाचणीच्या दुसऱ्या टप्प्याचीही परवानगी देण्यात आलीय.
‘कोवॅक्सीन’ची दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला येत्या ७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारत बायोटेकच्या या लशीचा पहिल्या टप्प्यात देशातील वेगवेगळ्या भागांत परीक्षण करण्यात आलंय. दुसऱ्या टप्प्यासाठी ३८० उमेदवारांवर लशीची चाचणी केली जाणार आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) दिल्ली आणि पाटणा, विशाखापट्टनममधील किंग जॉर्ज हॉस्पीटल, हैदराबादमधील निजामचं आयुर्विज्ञान संस्था इथे कोविक्सीनच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पार पडणार आहे. सोबतच रोहतकच्या पीजीआयमध्येही याची चाचणी सुरू आहे.