विशेष वृत्त

ऑनलाईन पद्धतीनं डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा आता घरबसल्या काढू शकता

सातबारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही.

ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा घरबसल्या काढू शकता आणि तो सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरताही येतो.

आता आपण डिजिटल सही असलेला सातबारा कसा काढायचा आणि तो वाचायचा कसा, याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

डिजिटल सातबारा कसा काढायचा?

सातबारा काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.

या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 किंवा ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा’ हा पर्याय दिसेल.

यावर तुम्ही क्लिक केल्यास ‘आपला 7/12’ नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

पण, जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन सातबारा काढण्यासाठी इथं आला असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं New User Registration या पर्यायावर क्लिक करायचं आहे

एकदा का तुम्ही इथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला Personal information म्हणजेच वैयक्तिक माहिती द्यायची आहे.

यामध्ये तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे.

त्यानंतर Occupation मध्ये तुम्ही काय करता ते सांगायचं आहे, जसं की business, service कि other म्हणजेच यापैकी वेगळं काही करता ते सांगायचं आहे.

यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारीख लिहायची आहे.

वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर Address Information म्हणजे पत्त्याविषयी माहिती सांगायची आहे.

यामध्ये Flat No (घर क्रमांक), Floor Number (ग्राऊंड फ्लोअर), Building Name (घरावर काही नाव असेल तर ते टाकू शकता.)

त्यानंतर Pincode टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप फॉर्मवर येऊन जातं.

पुढे Street Road (गल्लीचं नाव), Location (गावाचं नाव), City Area (तालुक्याचं नाव) टाकायचं आहे.

ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग-आयडी तयार करायचा आहे.

समजा मी Shrikant@1996 हा लॉग-इन आयडी टाकला, तर त्यानंतर Check availability या पर्यायावर क्लिक करून तो आयडी ऑलरेडी अस्तित्वात आहे की नाही, ते बघायचं आहे.

तो जर नसेल, तर त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ४ ते ५ प्रश्न असतात, सोपे असतात, त्यापैकी एकाचं उत्तर द्यायचं आहे.

त्यानंतर Captcha टाईप करायचा आहे. म्हणजे इथं दिसणारे आकडे किंवा अक्षरं पुढच्या कप्प्यात जशाच्या तसे लिहायचे आहेत.

सगळ्यात शेवटी सबमिट बटण दाबायचं आहे.

त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर रेजिस्ट्रेशन कम्लीट असा मेसेज येईल आणि मग तुम्ही क्लिक हेअर या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे.

त्यानंतर ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा’ असं शीर्षक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सगळ्यात शेवटी सूचना दिलेली आहे की, “Rs.15 will be charged for download of every satbara. This amount will be deducted from available balance.”

याचा अर्थ सातबाऱ्यासाठी 15 रुपये चार्ज केले जातील, ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील.

आता आपण नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आपल्या खात्यात इथं काही बॅलन्स नसतं. त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणं गरजेचं असतं.

ते कसे करायचे तर खाली असलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम अप असेल तर त्याद्वारे जमा करता येऊ शकतात. तसे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत.

त्यानंतर डिजिटल सातबाऱ्याच्या फॉर्मवर परत गेले, तर तिथं तुम्हाला 15 रुपये तुमच्या खात्यात जमा असल्याचं दिसेल.

आता डिजिटल सहीचा सातबारा मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्मवर दिलेली माहिती भरायची आहे.

यात जिल्ह्याचं, तालुक्याचं आणि गावाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर सर्व्हे किंवा गट नंबर टाकायच आहे आणि सगळ्यात शेवटी डाऊनलोड म्हणायचं आहे.

त्यानंतर डाऊनलोड झालेला सातबारा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

यावर स्पष्ट लिहिलेलं असतं की, हा सातबारा डिजटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही.

साताबारा कसा वाचायचा?

सातबाऱ्यावर सुरुवातीला गाव नमुना 7 आणि खाली गाव नमुना 12 असतो.

गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे, हे नमूद केलेलं असतं.

यामध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात गट क्रमांक दिलेला असतो आणि त्यानंतर कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत ही जमीन येते, ते सांगितलं असतं.

भूधारणा पद्धतीचे एकूण 4 प्रकार पडतात.

आमची जमीन भोगवटादार वर्ग- 1 या पद्धतीत येते. भोगवटादार वर्ग- 1 या पद्धतीतमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.

भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही.

यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इ. जमिनींचा समावेश होतो.

तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या ‘सरकार’ या प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.

चौथ्या प्रकारात ‘सरकारी पट्टेदार’ जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वार दिल्या जातात.

सातबारा हा ढोबळमानानं तीन प्रकारात विभागलेला असतो. यात शेताचं नाव. भोगवटादाराचं नाव व क्षेत्र आणि शेवटी खाते क्रमांक असतो.

शेताचं नावासमोर शेताला काही ठरावीक नाव दिलेलं असेल, तर ते इथं नमूद केलेलं असतं.

इथं तुमच्याकडे किती जमीन आहे ते हेक्टर आरमध्ये दिलेलं असतं. ती जिरायती आहे, बागायती आहे का तेसुद्धा सांगितलेलं असतं. एकूण क्षेत्र किती ती सांगितलेलं असतं. त्याखाली पोट खराब म्हणजेच लागवडीस अयोग्य अशा जमिनींची माहिती दिलेली असते.

त्यानंतर भोगवटादाराचं नाव म्हणजे ती जमीन कुणाच्या मालकीची आहे, ते सांगितलेलं असतं. त्यासमोर या जमिनीवर किती कर म्हणजेच शेतसारा आकारला जातो ते सांगितलं आहे.

तिसऱ्या रकान्यात खाते क्रमांक असतो. त्यात गाव नमुना आठ-असाठीचा खाते क्रमांक नमूद केलेला असतो. या भागात कर्जाचा बोजा आहे का,विहीर असेल तर त्यावर कुणाचा ह्क्क आहे, इ. माहितीही असते.

त्यानंतर खाली गाव नमुना -12 असतो. ही पिकांची नोंदवही असते.

यात तुम्ही कोणत्या वर्षी कोणती पीकं घेतली, ती किती क्षेत्रावर घेतली आणि त्यासाठी जलसिंचनाचा स्रोत काय आहे, हे नमूद केलेलं असतं.