पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या नोंदणीला २१ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई-राज्यात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या १ लाख १७ हजार जागांसाठी ९० हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतनकडे पाठ फिरवल्यानंतर यंदा मात्र मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नोंदणीला २१ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाचे चित्र गेल्या पाच वर्षात आशादायी नाही. अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक आणि इतर अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. यामुळे या अभ्यासक्रमात रिक्त जागांची संख्या गेल्या पाच वर्षात बरीच मोठी आहेत.
या प्रकाराने पाच वर्षात किमान पन्नासाहून अधिक महाविद्यालये बंद पडली, तर अनेक महाविद्यालयांनी या अभ्यासक्रमातील शाखा बंद करण्याचे प्रस्ताव विद्यापीठ आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे दिलेत.
मात्र, यावर्षी दहावीचा निकालात २६ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढणार असल्याचे भाकित सकाळने वर्तविले होते. त्यानुसार आतापर्यंत ९० हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यावर्षी राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विभागाने तंत्रनिकेतन अभ्याक्रमाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना घरून अर्ज भरता येणे शक्य होणार आहे. २१ सप्टेंबरपर्यंत नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हा आकडा १ लाखापेक्षा अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्ष – महाविद्यालय – एकूण जागा – रिक्त जागा
२०१७ – ७१ – २५,५९५ – १६,४९१
२०१८ – ६४ – १७,६८४ – ११,९४०
२०१९ – ६४ – १७,६८४ – १३, १४०