महाराष्ट्रमुंबई

देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’

मुंबई-अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनीदेखील तिच्या वक्तव्यावर टीका केली होती. परंतु अद्यापही हा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची ११ कोटी जनताही माफ करणार नाही, असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा या प्रकरणावरून टीका केली आहे.
‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?

मुंबई कुणाची? हा प्रश्नच कुणी विचारू नये. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहेच, पण देशाचे सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्रसुद्धा आहे. याच मुंबईसाठी १०६ मराठी माणसांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती हिंदुस्थानची आहे, पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती हिंदुस्थानची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना ‘पाकव्याप्त’ कश्मीरशी करणे व मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.

महाराष्ट्रातील ११ कोटी मऱ्हाटी जनतेस तर हा असा मुंबईचा अवमान म्हणजे देशद्रोहासारखा गुन्हा वाटतो, पण असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या मागे राष्ट्रभक्त मोदी सरकारचे गृहमंत्रालय सुरक्षा कवच घेऊन ठामपणे उभे राहते तेव्हा आपले १०६ हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील. महाराष्ट्र हा सत्यवादी हरिश्चंद्राचा पूजक आहे. मऱहाटी जनांशी बेइमानी करणाऱ्या विकृतांशी मराठी माणूस सतत लढत राहिला. कोणीही यावे आणि महाराष्ट्राच्या मऱ्हाटी राजधानीवर टपली मारावी, कोणीही ऐऱ्यागैऱ्याने उठावे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून आव्हानाची भाषा करावी या विरोधात संपूर्ण महाराष्ट्राने एकवटायला हवे.

‘देवी’स्वरूप आईची तुलना पाकव्याप्त भागाशी करून आमच्या देवीचाच अवमान केला. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा, धर्माचा आणि १०६ हुतात्म्यांच्या त्यागाचाच अवमान केला व असा अवमान करून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर नशेच्या पिचकाऱया टाकणाऱया व्यक्तीला केंद्र सरकार विशेष सुरक्षेच्या पालखीचा मान देत आहे.

मुंबादेवीचा हा अवमान ज्यांना प्रिय आहे असे लोक दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात बसले आहेत म्हणून मुंबईचा धोका कायम आहे. मुंबईला आधी बदनाम करायचे, नंतर खिळखिळे करायचे. मुंबईस संपूर्ण कंगाल करून एक दिवस ती महाराष्ट्रापासून तोडायची या कारस्थानाची पावले नव्याने पडू लागली आहेत हे आता स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रातील लोकनियुक्त सरकारच्या अधिकारावर आणि स्वातंत्र्यावर हल्ले करण्याची एकही संधी महाराष्ट्रातील भाजपवाले आणि केंद्र सरकार सोडत नाही.

देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री शहा यांचा ‘एकेरी’ नावाने उद्धार करणाऱ्या टिनपाट वृत्तवाहिनीच्या मालकास भाजपवाल्यांनी असा पाठिंबा दिला असता काय? आज ज्या पद्धतीने हे समस्त भाजपवाले महाराष्ट्रद्रोह्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत, तो ठामपणा आपल्या हद्दीत घुसलेल्या चिनी माकडांच्या बाबतीत दाखवला असता तर लडाख, अरुणाचलच्या सीमेवर देशाची बेइज्जती झाली नसती. देशाच्या इभ्रतीचे वाभाडे उघडपणे निघू नयेत म्हणून राष्ट्रभक्तांनी संयम बाळगला आहे इतकेच.