महाराष्ट्रमुंबई

रिया चक्रवर्ती हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला ड्रग्जप्रकरणी आज मंगळवारी अटक करण्यात आली. तिला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. सुशांतच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर यात रियाचे नाव समोर आले होते. तसेच तिने आपण ड्रग्ज घेतल्याचे कबुल केले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.
अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) ही कारवाई केली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता.
त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचे नाव पुढे आले. तिने एक व्हाटस्अॅपवर फोटो शेअर केला होता. हा फोटो व्हायरल होत होता. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज रियाला अटक करण्यात आली. सुशांतचा नोकर दीपेश सावंत याच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला चौकशीसाठी समन्स बजावले होते.

२८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ जणांना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केले. त्यानंतर आता एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.