देशनवी दिल्ली

जनधन खातेधारकांना विमा पॉलिसीचा लाभ मिळणार

नवी दिल्ली -आता जनधन खातेधारकांना जीवन आणि अपघात विमा पॉलिसी देण्यासंदर्भात सरकार निर्णय घेणार आहे. या खातेधारकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पीएम सुरक्षा विमा योजना सरकारकडून उपलब्ध करण्याचा विचार चालू आहे.

सध्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना 18 ते 50 वर्षांतील व्यक्‍तींसाठी असून यासाठी प्रत्येक महिन्याला 330 रुपये भरावे लागतात. नरेंद्र मोदी सरकारला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा पुढाकार घेण्यात येणार आहे.

लवकरच जनधन खातेधारकांना छोटी कर्ज उपलब्ध करण्याचा शक्‍यतेवरही विचार चालू असल्याचे अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. जनधन खात्याच्या आधारावर सरकार नेमके गरीब कोण आहेत त्यांना थेट मदत करू शकते.
आगामी काळातही या लोकांचे जीवनमान वाढविण्यासाठी या खात्याच्या माध्यमातून सरकारला प्रयत्न करता येणार आहेत. या खातेधारकातील महिलांना लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आर्थिक मदत देण्यात आली होती.