देशात रुग्ण वाढीचा नवा उच्यांक:बळींची संख्या 67 हजाराच्या वर
करोनाच्या रुग्णवाढीने राज्यासह देशात गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. देशात दिवसभरात ८३,८८३ तर राज्यात १८,१०५ नव्या रुग्णांची भर पडली.
देशातील करोना रुग्णांचा आकडा ३८ लाख ५३ हजार ४०६ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ६८ हजार ५८४ रुग्ण करोनामुक्त झाले असून, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ लाख ७० हजार ४९२ झाली आहे. ८ लाख १५ हजार ५३८ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १०४३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण बळींची संख्या ६७ हजार ३७६ वर पोहोचली आहे.
टाळेबंदी पूर्णपणे हटवण्याची शास्त्रज्ञांची मागणी
देशातील टाळेबंदी पूर्णपणे मागे घेण्यात यावी, असे निवेदन देशातील विविध संस्थांतील सुमारे ४० शास्त्रज्ञांनी जारी केले आहे. करोनाच्या नियंत्रणासाठी उपाय योजतानाच इतर अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लसीकरण, इतर आजारांवरील उपचार, व्यवस्थापन, गर्भवतींसाठीच्या योजना अशा मुद्दय़ांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.