देशनवी दिल्ली

महत्वाची बातमी:2017 आधी विक्री केलेल्या जुन्या वाहनांसाठी FASTag अनिवार्य

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर : रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road, Transport and Highways)देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर 1 डिसेंबर 2019 पासून सर्व खाजगी आणि सार्वजनिक वाहनांवर- चारचाकी किंवा त्यापेक्षा अधिक- FASTag अनिवार्य केला होता. आता परिवहन मंत्रालयाने डिसेंबर 2017 आधी विक्री केलेल्या जुन्या वाहनांमध्ये जानेवारी 2021 पासून FASTag अनिवार्य करण्याची अधिसूचना जारी केली आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार 1 डिसेंबर 2017 पूर्वी ज्या वाहनांची नोंद झाली आहे त्यांच्यामध्ये पुढील वर्षी जानेवारीपासून FASTag असणे बंधनकारक असेल.


त्याशिवाय एप्रिल 2021 पासून थर्ड पार्टी इन्शूरन्स प्रभावी करण्यासाठी फास्टॅग सक्तीचे करण्याचा प्रस्तावही मंत्रालयाने ठेवला आहे. यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानेही एक अधिसूचना जारी केली आहे.
मंत्रालयाने असे म्हटले आहे की, केंद्रीय मोटर वाहन नियम-1989 नुसार, 2017 पासून नवीन चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी FASTag अनिवार्य करण्यात आले आहे आणि वाहन निर्माता किंवा त्यांच्या डीलरद्वारे याचा पुरवठा करणे देखील बंधनकारक आहे. आता 1 डिसेंबर 2017 पूर्वी विक्री केलेल्या जुन्या वाहनांना म्हणजेच एम आणि एन वर्गातील मोटर वाहनांमध्ये (चारचाकी) फास्टॅग सक्तीचे करण्यासाठी CMVR, 1989 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव जानेवारी 2021 पासून लागू होईल. मंत्रालयाने या मसुद्याच्या अधिसूचनेला अधिसूचित केले असून, संबंधितांकडून सूचना मागविल्या आहेत.

वाहनांच्या थर्डपार्टी इन्शूरन्ससाठी फास्टॅग अनिवार्य

सरकारने नवीन नियम जारी केले आहेत. नवीन नियमांनुसार थर्ड पार्टी इन्शूरन्स करण्यासाठी देखील फास्टॅग अनिवार्य आहे. याआधी सरकारने गाड्यांचे रजिस्ट्रेशन किंवा त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट जारी करते वेळी गाडीमध्ये लावण्यात आलेल्या फास्टॅगचे डिटेल्स घेण्याचे निर्देश दिले होते.