देशनवी दिल्ली

स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात:ICMR चा मास्टर प्लॅन

कोरोना विषाणूच्या कचाट्यात सापडलेल्या जगाला वाचवण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयोगशाळेत लस तयार करण्यासाठी राबत आहेत. भारतामध्येही कोरोना लसीवर वेगाने काम सुरू असून स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे.
आयसीएमआरने याबाबत माहिती दिली आहे.

‘कोवॅक्सिन’ लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीत या लसीचे कोणतेही वाईट परिणाम दिसून आले नाहीत. पहिल्या टप्प्यात घेतलेल्या चाचणीत ही लस सुरक्षित असल्याचे दिसले. ‘कोवॅक्सिन’ लसीच्या चाचणीतील प्रमुख डॉ. इ. वेंकटा राव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीत शरीरात आवश्यक अँटीबॉडी तयार होतात अथवा नाही यावर विशेष लक्ष देण्यात आले.

दरम्यान, स्वयंसेवकांना पहिला डोस देण्यात आल्यानंतर 14 दिवसांनी दुसरा डोस देण्यात आला. यादरम्यान रक्ताचे नमुने घेऊन रक्तातील अँटीबॉडीबाबत माहिती मिळवण्यात आली. डोस देण्यात आल्यानंतर 28 व्या, 42 व्या, 104 व्या आणि 194 व्या दिवशी रक्ताचे नमुने घेण्यात येतील, असेही डॉ. इ. वेंकटा राव यांनी सांगितले.

देशात सध्या स्वदेशी कोवॅक्सिन लसीसह ऑक्सफर्ड विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या ‘कोशील्ड कोविड-19’ लसीची पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मदतीने चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. यासह अहमदाबाद मधील जायडस कॅडिला कंपनीने तयार केलेल्या ‘ZyCOV-D ‘ लसीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे.

ICMR चा मास्टर प्लॅन
दरम्यान, कोरोनावरील लस देशातील सर्व नागरिकांपर्यंत कमीत कमी कालावधीत पोहोचण्यासाठी ICMR मास्टर प्लॅन तयार करत आहे. संशोधकांना हिरवा कंदील मिळताच कोरोना लसीचे वेगाने उत्पादन घेतले जाईल.