महाराष्ट्रवृत्तसेवा

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना देवाज्ञा

नांदेड : राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी (31 ऑगस्ट) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा पसरल्याने हजारो भाविक अहमदपूर इथे जमले होते.त्यातच आज अप्पांचे निधन झाले.

राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी 1945 साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते. लाहोर विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत, वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यातून त्यांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता. अप्पांच्या जाण्याने लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे

कोण होते अहमदपुरकर महाराज?

लिंगायत समाजातील नावाजलेल्या महाराजांपैकी एक. वयाच्या 104 वर्षीही ते कार्यमग्न असे.
अहमदपूर मठाशी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या भागातील भक्तगण जोडलेले आहेत.
लाहोर विद्यापीठात स्वतंत्र पूर्व काळात एमएमबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. लिंगायत धर्म प्रसारात ते सतत कार्यरत राहिले.
वृक्ष जोपासना, राष्ट्र धर्म, राष्ट्रप्रेम या त्रिसूत्रीवर त्यांनी काम केले आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनात त्यांची भूमिका आणि सहभाग महत्वाचा होता. यासाठी राज्यभर लाखोंच्या मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे उत्तम संबध होते.