यंदाही शाळा 15 जूनलाच सुरू करण्याचा मानस
शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती
पुणे – राज्यातील शैक्षणिक वर्ष यंदाही 15 जूनलाच सुरू करण्याचा मानस आहे. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात करोना प्रसारामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेली आहेत. इयत्ता पहिली ते नववी, अकरावी या वर्गाच्या परीक्षाही रद्द करण्यात आलेल्या आहेत. मूल्यमापन करुन विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे बहुसंख्य निर्बंध घालण्यात आले आहेत.पालकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. विद्यार्थ्यांकडे शाळांची फी मोठ्या प्रमाणात थकलेली आहे. शाळांनी पालकांकडून फी वसुलीसाठी तगादा लावला होता. याबाबत थेट शिक्षणमंत्र्यांकडे पालक व इतर काही संघटनांनी तक्रारी केल्या होत्या.त्याची दखल घेऊन लॉकडाऊनच्या कालावधीत शाळांनी फी वसुलीचा तगादा लावू नये, असे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले होते. मात्र, काही शाळांकडून शासनाच्या आदेशाचे पालन होत नसल्याची बाब उघड झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांना पुन्हा एकदा सूचना दिल्या आहेत.