देशनवी दिल्ली

मास्क न वापरणाऱ्या लोकांमुळेच वाढू लागला कोरोना संसर्ग:आयसीएमआरने व्यक्त केली चिंता

कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 75 टक्क्यांवर गेला ही समाधानाची बाब असली तरी संसर्गाचा प्रसार प्रचंड वेगाने होत आहे.

अवघ्या गेल्या १६ दिवसांत देशात रुग्णसंख्या 10 लाखांवर वाढली आहे. तरुण किंवा वृद्धांमुळे नाही, तर मास्क न वापरणा-या बेजबाबदार लोकांमुळेच देशाची वाट लागली आहे. यासंदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) चिंता व्यक्त केली आहे.

‘अनलॉक-3’ 31 ऑगस्टला संपणार असून, त्यानंतरच्या अनलॉक-4च्या गाईडलाईन्स केंद्र सरकार लवकरच जाहीर करेल. मात्र, ‘आयसीएमआर’च्या डाटानुसार ‘अनलॉक’मध्ये रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. यासंदर्भात ‘आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले, तरुणांमुळे किंवा वृद्धांमुळे नाही, तर केवळ बेजबाबदार आणि काळजी न घेणारे लोक जे मास्क वापरत नाहीत त्यांच्यामुळेच देशात कोरोना महामारीचा संसर्ग होत आहे. 24 तासांत रुग्ण बरे होण्याची संख्या 66,550 आहे. रिकव्हरी रेट 75.92 टक्क्यांवर गेला आहे.

24 तासांत 84 जणांचा मृत्यू झाला. मृतांची एवूâण संख्या 58,390 वर गेली आहे. मृतांचा दर 1.84 टक्के आहे.
देशात आतापर्यंत 24,05,744 रुग्ण बरे झाले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा रिकव्हरी रुग्णांची संख्या 3.41 पटीने जास्त आहे.
तीन लसींच्या चाचण्या सुरू

देशात सध्या तीन कोरोना लसींच्या मानवी चाचण्या सुरु आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या लसची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. भारत बायोटेक लसची दुसऱ्या टप्प्यात आणि झायडस कॅडिलाच्या लसची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे, अशी माहिती डॉ. भार्गव यांनी दिली.

‘आयसीएमआर’कडून लवकरच व्हॅक्सिन पोर्टल तयार करण्यात येणार आहे. कोरोना आणि इतर साथीच्या आजारांवरील लस, नागरिकांनी काय काळजी घ्यावी याची माहिती या पोर्टलवर असणार आहे.

वाढीचा वेग प्रचंड

30 जानेवारीला केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. 10 लाख रुग्णसंख्येचा टप्पा गाठण्यासाठी 138 दिवसांचा कालावधी लागला.
10 लाख ते 20 लाख रुग्णसंख्या होण्यासाठी 21 दिवस लागले.
20 लाख ते 30 लाख रुग्णसंख्या होण्यास अवघे 16 दिवस लागले आहेत. अमेरिकेत हा 10 लाख रुग्णवाढीचा टप्पा ओलांडण्यासाठी 28 दिवस, तर ब्राझिलमध्ये 23 दिवसांचा कालावधी लागला होता.