उद्यापासून ऑक्सफोर्ड लसीच्या फेज – २ च्या चाचण्या सुरू होण्याची शक्यता
पुणे – ऑक्सफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या कोरोना लसीच्या फेज – २ मधील मानवी चाचण्यांसाठी पुण्यातील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज सज्ज झालं आहे. उद्यापासून फेज – २ मधील मानवी चाचण्यांना प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकते अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे.
फेज – २ च्या चाचण्यांसाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे देशभरातील १७ ठिकाणांची निवड करण्यात आली असून यामध्ये पुण्यातील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजचा देखील समावेश आहे.
भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमधील फेज – २ च्या मानवी चाचण्यांविषयी वैद्यकीय संचालक संजय लालवानी यांनी माहिती दिली आहे.
१) लसीच्या फेज – २ मानवी चाचण्यांसाठी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजतर्फे ५ स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे.
२) या सर्व स्वयंसेवकांची कोविड – १९ व अँटीबॉडी चाचणी केली जाणार आहे.
३) यापैकी ज्या स्वयंसेवकांच्या कोरोना व अँटीबॉडी चाचण्यांचे निकाल निगेटिव्ह येतील त्यांना उद्या (बुधवारी) देण्यात येणाऱ्या कोरोना लसीसाठी शॉर्ट लिस्ट केले जाईल.
४) भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजला ३०० ते ३५० स्वयंसेवकांवर लसीच्या फेज – २ मानवी चाचण्या करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलं आहे.
५) यासाठी निवडण्यात आलेले स्वयंसेवक १८ ते ९९ वर्ष वयोगटातील असतील.