महाराष्ट्रात अनलॉक करण्याची घाई करणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ठाणे : ‘देशात जूनपासून ‘मिशन बिगेन’ सुरु करण्यात आलं असलं तरी महाराष्ट्रात अनलॉक करण्याची घाई करणार नाही’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे (CM Uddhav Thackeray on Unlock). ‘आधी सर्व सुरु करायचं आणि नंतर बंद करण्याची वेळ येऊ नये त्यामुळे खात्री झाल्याशिवाय अनलॉकचा निर्णय घेतला जाणार नाही’, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
‘कोरोना नियंत्रणात येतोय ही चांगली बाब असली तरी कौतुकाचे बळी पडू नका. कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, हा जगाचा अनुभव असल्याने गाफीलही राहू नका’, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केलं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (24 ऑगस्ट) ठाणे महापालिका मुख्यालयाच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, तीनही महापालिकांचे आयुक्त आणि सर्व अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एमएमआर रिजनमधील महापालिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करत असलेल्या उपाययोजनांवर समाधान व्यक्त केलं.
‘देशात कोरोनाविरोधात जी लढाई सुरु आहे त्यात महाराष्ट्र कुठेही मागे नाही. एमएमआर रिजनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच होती. मात्र गेल्या महिनाभरात डॉक्टर, नर्स, पोलीस, शासकीय आणि पालिका यंत्रणांनी चांगल्या पद्धतीने मुकाबला केला. या सर्व यंत्रणाचा मला अभिमान आहे’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
‘गणपती उत्सव सुरु झाला आहे. दीड दिवसांच्या गणपतीचे विसजर्न झाले. पण आधी एक प्रश्न नेहमी विचारला जायचा, उत्सव कसा होणार? विसजर्न कसे होणार? मात्र सर्वधर्मीयांनी सामाजिक जाणीवेतून उत्सव साजरे केले’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.