आनंदाची बातमी:भारतात 73 दिवसात कोरोनाची लस उपलब्ध होणार
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : देशात कोरोनाचा दिवसेंदिवस होणारा विस्फोट त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. रशियानं जरी जगात लशीच्या स्पर्धेत पहिला क्रमांक लावला असला तरी अनेक सवाल उपस्थित होत आहेत. या सगळ्यात एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे भारतात 73 दिवसात कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे. ही लस नेमकी कोणती आणि याची किंमत काय आहे याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे.
टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार कोविशील्ड ही लस 73 दिवसांनी भारतात उपलब्ध होणार आहे. ही लस पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटनं तयार केली आहे. राष्ट्रीय टीकाकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकार ही लस मोफत उपलब्ध करून देण्याबाबत विचार करत आहे.यासंदर्भात सरकारकडून काही उपायोजनावर चर्चा सुरु असल्याचीही माहिती मिळाली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून या लशीच्या विशेष उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. या लशीची मानवी चाचणी 58 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार असल्यानं ही चाचणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. चाचणीचा पहिला डोस आजपासून देण्यात आला आहे. दुसरा डोस 29 दिवसांनंतर दिला जाईल. अंतिम चाचणी डेटा दुसरा डोस दिल्यानंतर 15 दिवसानंतर येईल. या कालावधीनंतर कोविशिल्टला बाजारात आणण्याचा सीरम संस्थेचे विचार आहे असंही अधिकारी म्हणाले.
भारतात कोरोना व्हायरच्या नव्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. शनिवारी देशातल्या एकूण रुग्णांच्या संख्येने 30 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. या आधी एकाच दिवसांत सर्वाधिक 69,878 रुग्ण आढळले होते.