देशात मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार, पंतप्रधान मोदींकडून संकेत
नवी दिल्ली : भारतात विवाहासाठी मुलींचं वय १८ वर्ष तर मुलांचं वय २१ वर्ष पूर्ण असणं आत्तापर्यंत आवश्यक होतं. परंतु, भारत सरकारकडून (Central government) आता मुलींच्या विवाहासाठी किमान वयोमर्यादा काय असावी यावर (Minimum age of girls for marriage) पुन्हा एकदा विचार केला जातोय. तसे संकेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ल्यावरून देशाला केलेल्या आपल्या संबोधनात दिलेत. लग्नासाठी मुलींचंही वय आता १८ वरून वाढवून २१ केलं जाऊ शकतं.
मुलींच्या विवाहासाठी किमान वयोमर्यादेवर पुनर्विचार करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलं असल्याचं पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनाला म्हटलंय. समितीनं आपला अहवाल सादर केल्यानंतर याबद्दल योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.मुलींचं विवाहाचं वय वाढवण्यामागचा मुख्य उद्देश मातृ मृत्यूदर (maternal mortality) कमी करण्याचा आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानंही यासंदर्भात केंद्राला निर्देश दिले होते.
तसंच, महिलेला आई बनण्याच्या योग्य वयाबद्दल सल्ला देण्यासाठी एक टास्क फोर्स बनवण्यात येईल, असं अर्थ मंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आपल्या मागच्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटलं होतं. अर्थ मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टास्क फोर्सच्या रिपोर्टनंतर मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलण्याचे संकेत दिले आहेत.