बीड

कौतुकास्पद;पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देण्यात येणारे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
हरीश दत्तात्रय खेडकर हे मूळ श्रीगोंदा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील रहिवाशी असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्रीगोंदा येथेच झाले आहे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे झालेले आहे. हरीश खेडकर हे पोलीस दलामध्ये सरळ सेवा पोलीस निरीक्षक म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९९२ मध्ये रुजू झाले. एक वर्ष नाशिक येथील पोलीस अकॅडमी मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लोहमार्ग नागपूर, जालना विशेष सुरक्षा शाखा पुणे, सातार, बुलढाणा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे, बीड, स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद, औरंगाबाद ग्रामीण इत्यादी ठिकाणी सेवा केलेली आहे. त्यांची सातारा जिल्ह्यातील कराड वाहतूक शाखा, उंब्रज पोलीस स्टेशन, पाटण पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद येथील कारकीर्द विशेष उल्लेखनीय असे राहिली आहे. सेवा कालावधी मध्ये त्यांनी अतिशय गुंतागंतीचे खुनाचे गुन्हे, दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. हरीश खेडकर यांना सेवाकाळात आतापर्यंत ४३१ बक्षिसे व ४५ प्रशसापत्रे मिळालेली आहेत.
मा. सुनील कडासने, पोलीस अधीक्षक व मा. निलेश सोनवणे, अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक तसेच मा. अखिलेश कुमार सिंह, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी हरीश खेडकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने त्याचे अभिनंदन केले आहे.