बारावीनंतरच्या डिप्लोमा प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
उद्यापासून प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार पॉलिटेक्निकसाठी अर्ज करता येणार
पुणे – बारावीनंतरच्या पदविका औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण विभागाने शनिवारी प्रसिद्ध केले. पदविका अर्थात डिप्लोमा प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दि. 10 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पॉलिटेक्निक अर्थात प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश दि. 10 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर शनिवारी तंत्रशिक्षण विभागाने पॉलिटेक्निक प्रवेशाबरोबरच डिप्लोमा प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. दोन्ही अभ्यासक्रमाचे प्रवेश दि. 10 ते 25 ऑगस्ट या कालावधीत होतील.
दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया तंत्रशिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन कागदपत्रांची पडताळणी करावयाची असल्यास, त्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच ज्यांना कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांनी जवळच्या सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्र पडताळणी करावयाची आहे.
अशा विद्यार्थ्यांना तारीख व वेळ ठरवून दिले जाईल. त्यानुसार गर्दी न होता सामाजिक अंतर ठेवून अर्ज निश्चिती करावी लागेल. डिप्लोमा व पॉलिटेक्निकसाठी अर्ज करताना खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना 400 रुपये, तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांना 300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
त्याचप्रमाणे कागदपत्र पडताळणीच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे 31 मार्च 2021 पर्यंतचे वैध असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रमाणपत्र सादर करू न शकणारे विद्यार्थ्यांना राखीव जागांवर दावा करता येणार नाही, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
डिप्लोमा अन् पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक
अर्ज करण्याची मुदत : दि.10 ते 25 ऑगस्ट
कागदपत्र पडताळणी : दि.11 ते 25 ऑगस्ट
तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध : दि.28 ऑगस्ट
यादीवर विद्यार्थ्यांचे आक्षेप : दि.29 ते 31 ऑगस्ट
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : दि.2 सप्टेंबर