माजी मुख्यमंत्री निलंगेकर आणि माजीमंत्री अनिल राठोड यांचे निधन
लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंञी डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय 91) आज पहाटे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. त्यांनी या वयातही कोरोनावर यशस्वी मात केली होती. त्यांना रुग्णालयातील नाॅन कोरोना वाॅर्डात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान त्यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले. त्यांच्यावर आज निलंग्यात आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
निलंगेकर हे 1985 ते 86 या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात त्या आधी अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते. न्युमोनियातून ते बरे होत होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांना बरे वाटत होते, आणि त्यांनी हलका आहारही घ्यायला सुरुवात केली होती.
मात्र बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अनिल राठोड यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, एक मुलगी व मुलगा विक्रम राठोड असा परिवार आहे. अनिल राठोड यांच्यावर सकाळी दहा वाजता अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनिल राठोड यांनी दीर्घकाळ हे नगर विधानसभा मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते.