बीडच्या निवडणूक घोटाळ्याची गंभीर दखल घोटाळेबाजांची विभागीय चौकशी करण्याचे उपसचिवांचे आदेश
बीड, दि.२९ (प्रतिनिधी)-बीड जिलह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीतील भ्रष्टाचार प्रकरणात प्रशासनातील बड्या आधिका-यांच्या संगनमताने अव्वाच्या सव्वा बिले आकारुन निवडणूक विभागातील निधी हडप केल्याचा प्रकार बीडच्या पत्रकारांनी समोर आणला होता. या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर चौकशी समितीही स्थापन करण्यात आली होती. आता या घोटाळ्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपसचिव माधव वीर यांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना दिले आहेत.थेट मंत्रालयातून या गंभीर प्रकरणाची दखल घेतल्यानंतर संबंधित आधिका-यांचे धाबे दणाणले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूकी अधिका-यांनी आपल्या विश्वासातील गुत्तेदारांना टेंडर देऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये आलेला निधी हडप केला. ९ कोटी रुपयांचा निधी केवळ मंडप उभारणीमध्ये खर्च करण्यात आला. आगदी टाचणी खरेदीपासून जेवणावळीपर्यंत इतर जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिलह्यामध्ये दहापटीने जास्त खर्च केला गेला.यासर्व घोटाळ्याचा पर्दाफाश करत बीडच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला गेला होता.त्यानंतर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी चौकशीसाठी दोन वेळा समिती स्थापन केली.या समितीचा अहवाला त्यांनी निवडणूक खात्याकडे सुपुर्द केला. या गंभीर प्रकरणाची दखल मंत्रालयानेही घेतली.मंत्रालयाचे उपसचिव माधव वीर यांनी सर्व घोटाळ्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना दिले आहेत. आता विभागीय चौकशी होणार असल्याने संबधित अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत.