कोरोनाच्या भितीने पत्रकाराचा मृत्यू झाल्याने गेवराईत खळबळ
कोरोनाग्रस्त मित्राबरोबर फिरल्याने आले होते डिप्रेशन
गेवराई-गेल्या काहि दिवसापासून तापेने आजारी असलेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाबरोबर फिरल्याने आपल्यालाही कोरोना होती काय? या भितीने गेवराईतील पत्रकार संतोष भोसले यांचा सकाळी बीड जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. यामुळे गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते गेवराईच्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत होते. अंत्यत सुस्वभावी स्वभावामुळे संतोष भोसले यांची ओळख होती. कोरोनाच्या भितीने पत्रकाराचा मृत्यू झाल्याने गेवराईत खळबळ माजली आहे.
संतोष भोसले हे गेल्या काहि दिवसापासून आजारी होते. त्यांना ताप येत होता. त्यामुळे त्यांनी यापुर्वी दोन वेळा कोरोनाची चाचणी केली होती. दोन्हीही वेळा ही चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र गेल्या काहि दिवसापुर्वी त्यांचा एक मित्र कोरोनाग्रस्त झाला. त्याचाबरोबर सातत्याने फिरल्यामुळे आपल्यालाही कोरोना होतो की काय? अशा विचाराने संतोष भोसले गेल्या तीन-चार दिवसांपासून जास्तच त्रस्त झाले होते. मंगळवारी मध्यरात्री त्यांना जास्त त्रास झाल्याने बीड येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणले होते. सकाळी त्यांच्यावर उपचारही करण्यात आले मात्र दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याचे रूग्णालयाच्या प्रशासनाने जाहिर केले. शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.