यापुढे प्रत्येक आठवड्यातील दोन दिवस कडक लॉक डाऊनचे; ‘या’ राज्याने घेतला निर्णय
कोलकाता – अनलॉकची प्रक्रिया राबवल्यानंतर देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढीचा आकडा दररोज एक नवा विक्रम नोंदवताना दिसतोय. कोरोना रुग्णामध्ये होत असलेली ही वाढ अनेक राज्यांसाठी चिंतेची बाब बनली असून यावर मात करण्यासाठी पुन्हा एकदा लॉक डाऊन करण्याचे निर्णय घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पश्चिम बंगालने देखील लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय घेतलाय.
मात्र पश्चिम बंगालमधील ‘हा’ लॉक डाऊन जरासा वेगळा असणार आहे. राज्यात आता प्रत्येक आठवड्यातील दोन दिवस कडक लॉक डाऊन पाळण्यात येणार असून या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येतील. राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आलंय.
याबाबतची माहिती राज्याचे गृहसचिव अलापन बंद्योपाध्याय यांनी दिली असून या आठवड्यात गुरुवार व शनिवार हे दिवस राज्यभरामध्ये कडक लॉक डाऊन म्हणून पाळण्यात येणार आहेत. यावेळी बोलताना बंद्योपाध्याय यांनी, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी सामूहिक संसर्ग झाल्याचे आढळले असल्याची माहिती देखील दिली.