पुणे

जीवदान देणाराच संकटात! देशभरात तेराशे डॉक्‍टर्स करोनाबाधित

99 डॉक्‍टरांचा मृत्यू : इंडियन मेडिकल असो.चा सर्व्हे

पुणे – करोनाच्या उद्रेकातही सर्वच डॉक्‍टर्स दिवस-रात्र झटत आहेत. यातून आतापर्यंत लाखो बाधितांना जीवदानही मिळाले आहे. त्यामुळे हे डॉक्‍टर्स समाजासाठी जणू देवाचे रूप आहेत. पण, या करोना संकटात तब्बल 1,302 डॉक्‍टर्सही बाधित झाले असून, काहींचा 99 डॉक्‍टरांचा मृत्यू झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएनशनने (आयएमए) केलेल्या एका सर्वेक्षणात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशभरातील किती डॉक्‍टरांना करोना संसर्ग झाला, याचा अंदाज घेण्यासाठी देशभरात सर्व्हेक्षण करण्याचा “आयएमए’ने निर्णय घेतला. गेल्या महिनाभरात बाधितांसह मृत्यू झालेल्या डॉक्‍टरांची माहिती संकलित करण्यात आली. देशातील सर्व शाखांच्या आयएमएने सुमारे 1,401 डॉक्‍टरांबाबत माहिती संकलित केली. हे सर्व डॉक्‍टर थेट करोना रुग्णांना रुग्णालयात उपचार देणारे आहेत. त्यापैकी 92 टक्के डॉक्‍टरांना करोनाचा संसर्ग झाला. तर 99 डॉक्‍टरांचा मृत्यू झाला असून, डॉक्‍टरांचा मृत्यूचा दर 8 टक्के झाला आहे.

बाधितांमध्ये सर्वाधिक प्रॅक्‍टिसिंग डॉक्‍टरांचा समावेश आहे. 1 हजार 302 पैकी 586 डॉक्‍टर प्रॅक्‍टिस करीत आहेत. त्या पाठोपाठ 566 डॉक्‍टर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर असून 150 रुग्णालयांतील सर्जनना बाधा झाली आहे. तर मृतांमध्ये फिजिशियन डॉक्‍टरच सर्वाधिक आहेत, तर सर्वाधिक कमी धोका रेसिडेंट डॉक्‍टर तर त्या पाठोपाठ अधिक धोका सर्जन डॉक्‍टरांना असल्याचे म्हटले आहे.

डॉक्‍टरांचा मृत्यूदर सर्वाधिक
देशात करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 3, महाराष्ट्रात 4 टक्के आहे. मात्र, देशातील डॉक्‍टरांचा मृत्यूदर हा 8 टक्के आहे. ही वैद्यकीय व्यावसायिकांसाटी धोक्‍याची घंटा आहे. त्याकरिता आयएमएने सर्व डॉक्‍टरांनी काळजी घेण्याचे आवाहन करताना करोनाबाबत “रेड अलर्ट’ चा इशारा दिला आहे.

करोनाबाधितांवर उपचार करण्यापूर्वी डॉक्‍टर्स पीपीई किट्‌स वापरतात. मात्र, किट्‌सच्या दर्जाबाबत पडताळणी आवश्‍यक आहे. सोबतच हे किट वापरण्याबाबत डॉक्‍टरांना विशिष्ट प्रशिक्षण घेण्याचा सल्लाही “आयएमए’ने दिला आहे.
– डॉ. शिवकुमारे उत्तुरे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *