महाराष्ट्रमुंबई

देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीत; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई: भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातील चार नेत्यांसह अचानक दिल्लीला गेले आहेत. राजस्थानमध्ये राजकीय नाट्य घडत असतानाच फडणवीस दिल्लीत गेल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रातही सत्तांतर होण्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत, त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्लीवारीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अचानक दिल्लीत दाखल झाले. त्यांच्यासोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, मदन भोसले आणि आमदार जयकुमार गोरे आहेत. राधाकृष्ण विखे पाटील मात्र दिल्लीत गेलेले नाहीत. तब्येत ठीक नसल्याने लोणीतच असल्याचं सूत्रांनी सांगितलं. साखर कारखान्यांचे प्रश्न आणि राज्याच्या राजकीय परिस्थितीबाबत हायकमांडशी चर्चा करण्यासाठी ते दिल्लीत गेल्याचं सांगण्यात येतं. दिल्लीवारीत ते भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

फडणवीस केंद्रीय समितीत?
दरम्यान, भाजपच्या केंद्रीय संसदीय कार्य समितीत फडणवीस यांची वर्णी लागल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे. त्याला फडणवीस किंवा भाजपमधून कुणीही अद्याप दुजोरा देण्यात आला नाही. फडणवीस दिल्लीत गेल्याने त्याबाबतची अधिक स्पष्टता आज सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *