उत्पादन शुल्क वाढवून मोदी सरकार स्वतःच्या सुटकेसमध्ये भरतेय
केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी या निर्णयावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, पेट्रोलवर आकारण्यात येणारे उत्पादन शुल्क प्रति लिटर १० आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३ रुपये असणार आहे. यानुसार पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर ८ रुपये रोड सेस आकारण्यात येणार आहे. तर विशेष अतिरिक्त शुल्काच्या स्वरूपात पेट्रोलवर प्रति लिटर २ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर ५ रुपये आकारण्यात येतील. मात्र, पेट्रोल पंपावर इंधनाच्या किरकोळ विक्रीवर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. यामुळे या उत्पादन शुल्क वाढीचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार नाही.
याच पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे की,’कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात झाली असून सर्वसामान्य जनतेला याचा फायदा मिळायला हवा. मात्र, भाजपा सरकार सातत्याने एक्साईज ड्युटी वाढवत असून जनतेला मिळणारा सगळा फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरत आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे.’
दरम्यान, याआधी देशाची राजधानी दिल्लीत आप सरकारने इंधनांवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढवला. त्यामुळे दिल्लीत लिटरमागे पेट्रोल १ रुपया ६७ पैशांनी तर डिझेल तब्बल ७ रुपये १० पैशांनी महागले आहे.