औरंगाबादेत जनता कर्फ्यु:नऊ दिवस नो एन्ट्री
औरंगाबाद : करोना विषाणूचा संसर्क थोपविण्यासाठी औरंगाबादमध्ये दहा ते १८ जुलैदरम्यान पुकारण्यात आलेला ‘जनता कर्फ्यू’ (लॉकडाऊन) यशस्वी व्हावा. करोना विषाणूची साखळी तुटावी यासाठी शहरात विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या काळात बाहेर गावांहून नागरिकांनी औरंगाबाद शहरात येऊ नये, असे आवाहन महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केले आहे
‘लॉकडाऊनआच्या काळात पोलिस प्रशासनाला मदत करण्याची भूमिका महापालिकेची आहे. त्यासाठी महापालिकेने विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, असे सांगताना प्रशासक पांडेय, ‘लॉकडाऊन सहाय्यक, सुपरवायजर आणि शेल्टर ऑफिसर अशी तीन स्तरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांना त्यांची कामे वाटून देण्यात आली आहेत. त्याशिवाय १७ पथके तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी १३ पथके ‘टास्क फोर्स’च्या प्रमुख अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली काम करतील. चार पथके उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत. विजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथके शहराच्या ‘एन्ट्री पॉइंट’वर तैनात असतील. बाहरेच्या गावातून शहरातून कुणालाही येऊ दिले जाणार नाही. गरज पडल्यास या पथकांमध्ये वाढ केली जाईल.’अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली पथके ‘करोना पॉझिटिव्ह’ रुग्णाच्या निवासस्थानाच्या पाचशे मीटर परिघातील व्यक्तींची करोना चाचणी घेतली. या सर्व पथकांसाठी स्मार्ट सिटी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘लॉकडाऊन’च्या काळात बाहेर गावातील व्यक्तींनी औरंगाबाद शहरात येऊ नये. त्या व्यक्ती औरंगाबाद शहरात आल्याच तर त्यांची करोना चाचणी केली जाईल, त्यांना ‘क्वारंटाइन’ केले जाईल, असेही आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
शहरात २०० ठिकाणी ‘चेक पॉइंट’ तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक ‘पॉइंट’वर २४ तास व्हिडिओ चित्रिकरण केले जाणार आहे. सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय कुणालाही ‘लॉकडाऊन’च्या काळात शहरात फिरता येणार नाही किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी जाता येणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.