विदेश

चीनची चहुबाजूने कोंडी; अमेरिका, ब्रिटनसह २७ देश एकवटले!

वॉशिंग्टन: चीनच्या आक्रमक विस्तारवादी भूमिकेमुळे आता जगभरात रोष निर्माण होत आहे. त्याचवेळी चीनमधील मानवाधिकार हक्कांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. हाँगकाँग सुरक्षा विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसह २७ देश एकवटले आहेत. त्यामुळे आता चीन आणि अमेरिकेमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.अमेरिका चीनमध्ये सुरू असलेल्या मानवाधिकाराच्या गळचेपीचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगात उपस्थित करणार आहे. मानवाधिकार आयोगात अमेरिका, ब्रिटनच्या आवाहनावर या मुद्यावर अनौपचारिक चर्चादेखील झाली आहे. ऑस्ट्रेलिया, जपानसह आशियान गटातील महत्त्वाच्या देशांची अमेरिकेला साथ मिळणार आहे. त्याशिवाय युरोपमधील अनेक देश चीनविरोधात भूमिका घेणार असल्याचे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियाने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिका-चीनच्या वाढत्या तणावाला लक्षात घेऊन लष्करावरील खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन लष्कर, नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक शस्त्रांचा समावेश करण्यात येणार आहे. भारतासोबत चीनचा वाद सुरूच असून चीनचा जपानसोबत सेनकाकू बेटाच्या मुद्यावर तणाव वाढला आहे. तर, दक्षिण चीन समुद्रावर वर्चस्व गाजवण्यासाठी चीनची धडपड सुरू असल्यामुळे अन्य देशांसोबतच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. चीनने तैवानला धमकी दिल्यानंतर अमेरिकन नौदलाची युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात दाखल झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *