महाराष्ट्रमुंबई

राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन; १ जुलैपासून ‘मिशन बिगिन अगेन २.०’

मुंबई: राज्यात ‘ मिशन बिगिन अगेन ‘चा दुसरा टप्पा ३१ जुलैपर्यंत असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून या दरम्यान अनेक निर्बंध मात्र टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येणार आहेत. एकंदर आणखी एक महिना राज्यातील जनतेला टाळेबंदीतच काढावा लागणार आहे. ( Mission Begin Again 2.0 )
राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन ( Maharashtra Lockdown ) सुरू आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यात १ जूनपासून केंद्राची नवी नियमावली आल्यानंतर राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू करण्यात आले. त्यात कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागांत बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले. मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा ३० जून म्हणजेच उद्या संपत आहे. त्यामुळेच १ जुलैपासून पुढे काय, असा प्रश्न सामान्यांना होता. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्याला संबोधित करताना अनेक बाबी स्पष्ट केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने लॉकडाऊन उठवलं जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले होते. त्यानुसार आता शासनाकडून स्पष्टता आली आहे.
सरकारने राज्यात ३१ जुलैपर्यंत मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. त्यात आधीपासून लागू असलेले बहुतेक नियम कायम राहणार आहेत. राज्यात लॉकडाऊन दरम्यान जिल्हाबंदी आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे. ही बंदी यापुढेही कायम राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागात ये-जा करण्याची मुभा आहे ती मात्र कायम राहणार आहे. एसटीची मर्यादित सेवा राज्यात सुरू झाली आहे. ती यापुढेही तशीच राहणार आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
केवळ आर्थिक चक्र सुरु करण्यासाठी महाराष्ट्रात मिशन बिगिन अगेन सुरु केल असलं तरी करोनाचं संकट टळलेलं नाही, धोका टळलेला नाही, गर्दी करू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर जा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करताना केले होते. करोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसले तर नाईलाज म्हणून काही भागात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल. आता असे होऊ द्यायचे का याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. ३० जूनला लॉकडाऊन संपणार आणि सगळेच व्यवहार पुन्हा सुरू होणार या भ्रमात न राहू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या संबोधनात टाळेबंदी वाढणार, असे स्पष्ट संकेत मिळाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *