पुणेमहाराष्ट्र

राज्यातील 36 लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप होणार

पुणे – समग्र शिक्षा अभियानातंर्गत राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या 36 लाख 32 हजार 281 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून 218 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. गणवेश पुरवठ्याबाबत सर्व अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहेत.
मोफत गणवेश योजनेबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला तीन रुपये दराचे दोन गणवेश देण्याची तरतूदही करण्यात आलेली आहे. गणवेश योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये याची खबरदारी शाळा व्यवस्थापनाची घ्यावी, अशा सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक डॉ.अश्‍विनी जोशी यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्‍त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत.
गणवेश खरेदीचे अनुदान जिल्हास्तरावरुन थेट शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर वितरित करण्यात येणार आहे. शालेय गणवेशाचा रंग, प्रकार, स्पेशिफिकेशन याबाबतचा निर्णयही शाळा व्यवस्थापन समितीला घ्यावा लागणार आहे. याबाबतील राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर निर्णय घेण्यात येणार नाहीत. उत्तम दर्जाचे गणवेश विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहेत. मंजूर तरतूदीपेक्षा अधिकचा खर्च होणार नाही याची दक्षताही शाळांना बाळगावी लागणार आहे. शाळा स्तरावरील स्टॉक रजिस्टरमध्ये गणवेशाबाबत सर्व नोंदी कराव्या लागणार आहेत.जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना गणवेश योजनेची अंलबजावणी करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर संबंधित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक यांच्या बैठका मार्गदर्शन करण्याबाबतचे आदेशही दिले आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गटांचे अहवाल जमा करुन संकलित अहवाल, उपयोगिता प्रमाणपत्र प्राथमिक शिक्षण संचालक व प्राथमिक शिक्षण परिषद यांच्याकडे दि. 31 ऑगस्टपर्यंत सादर करणे बंधनकारक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *