३० जूननंतर लॉकडाउन उठणार का? काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरें
मुंबई- ३० जूनला लॉकडाउनची मुदत संपते आहे. पुढे काय हा प्रश्न तुमच्या मनात असेल. ३० जून नंतर लॉकडाउन उठणार का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच हे सगळं असंच सुरु राहणार का? तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे. सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी सुरु करतो आहोत. सगळं सुरु केलं म्हणून परिस्थिती सुरळीत झाली असं समजू नका नाहीतर करोन आ वासून बसला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. आपलं सरकार काळजीवाहू सरकार नाही मात्र महाराष्ट्राला तुमची काळजी आहे असंही ते म्हणाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी डगमगून जाऊ नका असंही आवाहन केलं.
मुख्यमंत्र्यांनी मानले सर्वधर्मीयांचे आभार
सर्व धर्मीयांचे मी आज आभार मानतो आहे.. कारण करोनाची शिमग्यानंतर बोंब सुरु आहे. त्यानंतर जे काही सण आले ते लोकांनी साजरे केले असं मी म्हणणार नाही.. मात्र सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार त्यांनी सण साजरे केले. दहीहंडीचा उत्सव रद्द करण्यात आला. ईद साजरी करण्यात आली तीही घरच्या घरी. आता गणेशोत्सव साजरा होणार आहे त्यात सार्वजनिक मंडळांनीही सरकारने घालून दिलेले निर्देश कोणत्याही अटी न घालता मान्य केले आहेत. त्यामुळे मी सर्वधर्मीयांचे आभार मी मानतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच विठूरायाच्या चरणी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे आणि हे संकट दूर व्हावं म्हणून साकडं घालणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.