महाराष्ट्रमुंबई

वैद्यकीय परीक्षांचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार; शासन निर्णय निर्गमित

मुंबई, दि. २५ :  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर करण्यासह दरवर्षीप्रमाणे दोन पेपर मध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.वैद्यकीय परीक्षांबाबतची भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मार्गदर्शक तत्त्वे व सूचना आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासह या क्षेत्रातील तज्ज्ञांची मते विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने परीक्षा न घेण्याच्या मुद्यावर काहीसा प्रतिकूल प्रतिसाद दिल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता सुरक्षेच्या सर्व बाबी विचारात घेऊन या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *