शिक्षकांच्या थकीत वेतनाचा लवकरच निर्णय
मुंबई. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांना अनुदानासह मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील शिक्षण संस्था, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सोमवारी सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन विधानपरिषद आमदार आणि महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव दत्तात्रय सावंत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना दिले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही ते निवेदन सादर करण्यात आले.राज्यातील घोषित, अघोषित तसेच अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी दिले. त्यामुळे आता मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होतो याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.