कोणत्या ठिकाणी अधिक काळ कोरोना विषाणू टिकू शकतो ?
मुंबई : जास्त आर्द्रता असलेल्या भागात करोनाचा विषाणू जास्त काळ टिकाव धरू शकतो. यामुळे अशा भागांमध्ये अधिक काळजी घेत तेथील लोकांना मास्कची सक्ती करावी, अशी विनंती मुंबई आयआयटीतील संशोधकांनी प्रशासनाला आपल्या संशोधन प्रबंधातून केली आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे जग पूर्णपणे थांबले होते. मात्र आता ‘संपर्कविरहित’ जीवन जगण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे करोनावर अधिक संशोधन व्हावे असे शास्त्रज्ञांना वाटत आहे. या दृष्टीने जगभरात विविध बाीबींवर संशोधन सुरू आहे. मुंबई आयआयटीतील प्राध्यापक रजनीश भरद्वाज आणि अमित अग्रवाल यांनी विविध प्रकारच्या पृष्ठभागांवर विविध वातावरणीय परिस्थितीमध्ये करोना विषाणू किती काळ तग धरू शकतो याचा अभ्यास केला. यात जास्त आर्द्रता असलेल्या भागात हा विषाणू अधिक काळ तग धरू शकतो, असे निदर्शनास आले आहे. हा प्रबंध ‘फिजिक्स ऑफ फ्लुइड्स’ या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
‘जलबिंदूंमध्ये करोनाचा विषाणू किती काळ तग धरू शकतो हे जलबिंदू किती वेळात शुष्क होते यावर अवलंबून असते’, असे प्रा. भारद्वाज यांनी सांगितले. ‘यापूर्वी करोना विषाणूला तग धरण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचे जलबिंदू लागते, असे समजले जात होते. मात्र आता अतिसूक्ष्म जलबिंदूतही हा विषाणू तग धरू शकतो, असे समोर आले आहे’, असेही भारद्वाज यांनी सांगितले.
‘जलबिंदूच्या बाष्पीभवनाला लागणारा वेळ आणि करोनाचा वाढता प्रादुर्भाव याचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्क, शिकागो, लॉस एंजलेस, मियामी, सिडनी आणि सिंगापूर या पाच शहरांचे वातावरण आणि रुग्णसंख्या याचा विचार केला. यात न्यूयॉर्कसारख्या शहरात बाष्पीभवन होण्यास लागणारा वेळ हा अधिक होता. परिणामी तेथील रुग्णसंख्याही अधिक होती, असे समोर आले. याउलट निरीक्षण सिंगापूरमध्ये नोंदविण्यात आले. याचप्रकारे देशात जशी तापमान वाढ झाली, तसे दिल्लीत मुंबईच्या तुलनेत रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले होते’, असे निरीक्षण प्रा. भारद्वाज यांनी नोंदविले. मुंबईत जास्त आर्द्रता असून सरकारने साथीवर नियंत्रण आणण्यासाठी या बाबीचाही अभ्यास करावा, असेही ते म्हणाले. यामुळे जास्त आर्द्रता असलेल्या भागात मास्क सक्ती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
येथे अधिक धोका
संशोधकांनी विविध आकाराचे जलबिंदू हे विविध वातावरणात व विविध पृष्ठभागांवर तपासून पाहिले. यात काच किंवा स्टीलच्या पृष्ठभागावर जलबिंदूचे बाष्पीभवन होण्यास इतर पृष्ठभागांच्या तुलनेत ६० टक्के अधिक वेळ लागतो. यामुळे स्मार्ट फोनचे स्क्रीन आणि लाकडी फर्निचर वारंवार स्वच्छ करत राहावे, अशी सूचनाही यामध्ये करण्यात आल्याचे प्रा. अमित अग्रवाल यांनी सांगितले. जेथे आर्द्रता कमी आहे, अशा भागात आणि सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी विषाणू फार काळ तग धरू शकत नाही, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे.