शेतकऱ्याच्या वेषात टाकली धाड!कृषीमंत्र्यांचे ‘स्टिंग ऑपरेशन
औरंगाबाद: राज्याच्या कृषी मंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या दादाजी भुसे यांनी शेतकरी म्हणून वेषांतर करत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रविवारी उघडकीस आणली. मागणी करुनही कृषीमंत्र्यांना विक्रेत्यांनी युरिया खत दिले नाही. दुकानात अनागोंदी असल्याचा संशय बळावल्यानंतर शेतकरी असलेल्या कृषीमंत्र्यांनी आपले खरे रुप उघड करत कृषी अधिकाऱ्यांकरवी दुकानाची तपासणी केली असता युरियाचा मोठा साठा आढळून आला आहे. संबंधित दुकानावर कायदेशीर कारवाई केली जात असून गुणनियंत्रण निरीक्षकास सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी पत्रकारांना बोलताना दिली.
शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्वाचा असतो. त्यात करोना व लॉकडाऊन मुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे, असे असतानाच खत खरेदी करताना शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. एका खतावर दुसरे खत वा बियाणे असे लिकेंजची सक्ती केली जाते, युरिया जादा दराने विक्री केला जात आहे, अशा तक्रारी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे सत्यता पडताळणीसाठी कृषीमंत्री मालेगावाहून थेट औरंगाबादेत दुपारी दिड वाजता दाखल झाले. मंत्री म्हणून कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी चेहऱ्यावर पोंगटे बांधले आणि एका कार्यकर्त्यांची दुचाकी घेतली. दुचाकीवरुन त्यांनी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील नवभारत फर्टिलायझर्स हे दुकानात दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोहोचले. सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनी दुकानदास युरिया खताची मागणी केली. परंतु उपलब्ध नसल्याचे उत्तर विक्रेत्याने दिले. किमान पाच बँग तरी युरिया द्या, अशी विनंती कृषीमंत्र्यांनी केली. तब्बल अर्धा तास कृषीमंत्री मागणी करत होते परंतू विक्रेत्यांकडून नाही हेच उत्तर येत होते. त्यावेळी कृषीमंत्री भुसे यांनी फलकावर तर साठा असल्याचे का लिहिलेले आहे, साठा रजिस्ट्रर कुठे आहे, अशी विचारणा केली असता विक्रेत्याने उडवाउडवीचे उत्तर दिली. शेवटी दुकानात अनागोंदी आहे, हे लक्षात कृषीमंत्र्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून घेतले.
युरियाचा मोठा साठा
कृषी अधिकारी दाखल होताच कृषीमंत्र्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेत दुकान तसेच विक्रेत्यांच्या सातही गोडावूनची तपासणीचे निर्देश दिले. सायंकाळपर्यंत करण्यात आलेल्या तपासणीत युरियाच्या एक हजार ८६ बँग आढळून आल्या आहेत.