आता कोरोनावर करता येणार मात:या गोळीनं बरा होणार रुग्ण;कंपनीचा दावा
मुंबई, 21 जून : चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं भारतासह अनेक देशांमध्ये थैमान घातलं आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झाली नाही. वेगवेगळ्या देशांमध्ये ही लस आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच आता मुंबईतील एका कंपनीनं कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा केला आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स नावाच्या कंपनीनं कोरोनाची सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी औषध तयार केलं आहे.
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार हे अँटिव्हायरल औषध घेतल्यानंतर कोरोना बरा होतो. कोविड-19 ची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना हे औषध बरं करेल असही या कंपनीनं म्हटलं आहे. वैद्यकीय चाचणीदरम्यान हे औषध परिणामकारक ठरल्यानं कोरोनावरील उपचारासाठी या गोळ्या देण्याची परवानगी मिळाली आहे.चाचणीमध्ये फॅबिफ्लूचा डोस दिल्यानंतर रुग्णांमध्ये चांगले परिणाम दिसून आले. या गोळीची किंमत प्रति टॅबलेट 103 रुपयांना उपलब्ध होणार आहे. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं अशी माहिती आणि सूचना ग्लेनमार्कचे अध्यक्ष ग्लेन सल्डाना यांनी सांगितलं आहे. सध्या कोरोनावर कोणतीही लस नाही आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये हे औषध संजीवनी ठरेल.
महाराष्ट्रात शनिवारी रुग्णवाढीचा आणि मृत्यूंचा नवा उच्चांक झाला. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात3874 नवे रुग्ण आढळले. तर शनिवारी तब्बल 160 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात राज्यात एकूण 128205 रुग्ण झाले आहेत. तर 5148 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला. राज्यातल्या 160 पैकी तब्बल 136 मृत्यू फक्त मुंबईतले आहेत. या संख्येमुळे महाराष्ट्र हादरुन गेला आहे.