अनैतिक संबंधांतून जन्मलेल्या बाळाचे मातेनेच मुंडके छाटले
औरंगाबाद: अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकामुळे होणारी बदनामी टाळण्यासाठी अर्भकाचे मुंडके छाटून धड वेगळे करणाऱ्या एका मातेसह चौघांच्या पोलिस कोठडीत २० जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. माने यांनी गुरुवारी दिले.
गीताबाई अजय नंद (वय ३४) असे आईचे नाव असून रतनलाल भोलाराम चौधरी (वय ७५), गंगाबाई रतनलाल चौधरी (वय ७०) व हरीशकुमार सुभाषलाल पालीवाल (३८, सर्व रा. दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे, छावणी मोहल्ला) अशी तिच्या साथीदारांची नावे आहेत. या प्रकरणात महापालिकेचे साफसफाई सुपरवायझर सतीश लिंबाजी मगरे (४७, रा. लेबर कॉलनी) यांनी तक्रार दिली. २९ एप्रिल रोजी सकाळी पावणेसहा वाजता मगरे हे हाताखालील कर्मचाऱ्यांना ड्युटीचे वाटप करीत होते. त्यावेळी गल्लीतील रोडवर अर्भकाचे मुंडके पडलेले असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघा आरोपींना पोलिसांनी १६ जून रोजी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने आरोपींना १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. कोठडी दरम्यान आरोपी रतनलाल चौधरी याने अर्भकाचे शरीर शहागंज येथील एका लहान जागेत पुरल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पंचासमक्ष सदरील जागेची तपासणी केली असता मृत अर्भकाचे कोणतेही अवयव पोलिसांना सापडले नाहीत. तसेच आरोपींनी शस्त्राने अर्भकाचे मुंडके धडावेगळे केल्याचे समोर आले.
उर्वरित शरीराचा शोध सुरू
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी आरोपींनी अर्भकाचे मुंडके छाटून उर्वरित शरीर कोठे पुरले आहे याचा शोध घेणे आहे. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का? तसेच हा नरबळी किंवा करणीचा प्रकार आहे का? याचा देखील तपास करणे बाकी असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.