करोनाबाधितांसाठी मोठा दिलासा ‘हे’ औषध ठरणार संजीवनी!; मृत्यूदरात घट
लंडन-करोना विषाणूच्या आजाराला अटकाव करण्यासाठी विविध औषधांवर संशोधन सुरू असताना ब्रिटनमधून मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी डेक्सामेथासोन हे औषध संजीवनी ठरणार आहे.
करोनाबाधितांसाठी हे औषध ठरणार संजीवनी!करोनाबाधितांसाठी ‘हे’ औषध ठरणार संजीवनी!
लंडन: करोनाच्या आजारावर परिणामकारक ठरणाऱ्या औषधाचा शोध लागला असल्याचा दावा ब्रिटीश वैज्ञानिकांनी केला आहे. या औषधामुळे करोनाच्या आजारामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णांवर उपचार करता येणे शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. डेक्सामेथासोन या स्टेराइडमुळे करोनामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांच्या मृत्यू दरात एक तृतीयांश घट झाली असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
डेक्सामेथासोनचा वापर २१०४ रुग्णांवर करण्यात आला. या रुग्णांची तुलना इतर सामान्य उपचार घेणाऱ्या ४३२१ रुग्णांशी करण्यात आली. या औषधाच्या वापरानंतर व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यू दरात तब्बल ३५ टक्के घट झाली असल्याचे समोर आले. तर, ज्या रुग्णांना ऑक्सिजन देण्यात येत होते. त्या रुग्णांचा मृत्यू दरही २० टक्के घटला असल्याचे संशोधनात आढळून आले.
वाचा: करोना: स्वस्तातील लसीची चाचणी सुरू; अमेरिकेतूनही चांगली बातमी
डेक्सामेथासोन परवडणारे
ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे संशोधक पीटर होर्बी यांनी सांगितले की, संशोधनातून समोर आलेलेल निष्कर्ष हे आशादायी आहेत. या औषधामुळे मृत्यू दर कमी करणे आणि ऑक्सिजनच्या मदतीने उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा फायदा झाला. त्यामुळे गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांवर डेक्सामेथासोनचा वापर करायला हवा असं त्यांनी म्हटले. डेक्सामेथासोन औषध प्रचंड महाग नसून जगभरातील करोनाबाधितांचे प्राण वाचवण्यासाठी याचा वापर करता येणे शक्य असल्याचेही त्यांनी म्हटले. करोनाबाधितांच्या उपचारासाठी डेक्सामेथासोनचा वापर करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेकडून स्वागत
जागतिक आरोग्य संघटनेने डेक्सामेथासोनच्या वापरातून यशस्वी उपचार करणाऱ्या संशोधकांचे आणि रुग्णांचे अभिनंदन करण्यात आले आहे. या औषधाच्या वापरामुळे मृत्यू दरात घट होत असून गंभीर आजारी असलेल्या करोनाबाधितावर यशस्वी उपचार करणे शक्य असल्याचे प्राथमिक चाचणीत आढळले असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.